Old Rajender Nagar Incident : दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आता मृत्यू झालेल्या तीघांपैकी एकाच्या नातेवाईकाने या घटनेबाबत प्रतिक्रिया देत त्यांची व्यथा मांडली आहे.
या दुर्घटनेत श्रेया यादव, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी आहे. श्रेया यादव या मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकाने एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी मी शवगृहात गेलो, तेव्हा मला तिचा चेहराही बघू दिला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
ते नेमकं काय म्हणाले?
“या घटनेबाबत मला कोचिंग सेंटर किंवा प्रशासनाकडून अधिकृत कोणतीही देण्यात आलेली नाही. टीव्हीच्या माध्यमातून मला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मी रात्री उशीरा दिल्लीत दाखल झालो. मी शवगृहात गेलो असता, तिथे तिघांचे मृतदेह ठेवले होते. मी तिथल्या अधिकाऱ्यांना चेहरा बघून ओळख पटवू देण्याची विनंती केली. मात्र, ही पोलीस केस आहे, असं सांगून त्यांनी मला चेहरा बघू दिला नाही. फक्त एक कागद दिला, ज्यावर श्रेया यादव असं नाव लिहिलं होतं”, अशी प्रतिक्रिया मृतकाच्या नातेवाईकाने दिली.
पुढे बोलताना, “कागद बघितल्यानंतर मी बाहेर येऊन पुन्हा गाडीत बसलो. त्यानंतर सकाळी ६ वाजताच्या सुमारास मी पुन्हा शवगृहात गेलो, तेव्हाही मी त्यांना चेहरा बघू देण्याची विनंती केली. पण तपास अधिकारी येईपर्यंत तुम्हाला तिचा चेहरा बघता येणार नाही, असं तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितले”, असेही ते म्हणाले.
मला रात्री १२ च्या सुमारास जेवण केलं, तेवढ्यात…
दरम्यान, तुम्हाला या घटनेची माहिती कधी मिळाली? असं विचारलं असता, मला रात्री १२ च्या सुमारास टीव्हीच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाली, असे त्यांनी सांगितलं. “मी रात्री १२ च्या सुमारास जेवण करून टीव्ही बघत होतो. त्यावेळी दिल्लीत अशाप्रकारची घटना घडल्याचे दिसलं. पुढच्या १० मिनिटांच दोन मुलींचा मृत्यू झाल्याचीही बातमी आली. त्यावेळी मी श्रेयाला फोन लावला. मात्र, तिचा फोन बंद येत होता. तेव्हा माझ्याकडून राहावलं गेलं नाही. म्हणून मी दिल्लीला येण्यासाठी निघालो. वाटेत असताना मी कोचिंग सेंटरमध्ये फोन केला, तेव्हा त्यांनी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगितले. रात्री एक वाजता श्रेयाच्या रुमवर पोहोचलो, तेव्हा रुमला लॉक होतं. ज्यावेळी मी घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा श्रेयाचा मृत्यू झाल्याचं समजलं”, असे त्यांनी सांगितले.