ज्या रामलीला मैदानावर सरकारविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले त्याच मैदानावर आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी लाखभर दिल्लीकरांच्या साक्षीने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानताना ‘आम आदमी’च आज मुख्यमंत्री झाल्याची विनम्र भावना व्यक्त केली. सत्तेचा गर्व, अहंकार न बाळगण्याचा सल्लाही केजरीवाल यांनी स्वपक्षीय आमदारांना या वेळी दिला.
सकाळपासूनच रामलीला मैदानाकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. साडेअकराच्या सुमारास अरविंद केजरीवाल सहकाऱ्यांसह शपथविधी सोहळ्यासाठी मैदानावर पोहोचले. त्या वेळी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून व टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांच्यासह सात जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर झालेल्या छोटेखानी भाषणात केजरीवाल यांनी आपल्या सरकारची रूपरेषा स्पष्ट केली. माझ्या हाती जादूची कांडी नाही. समस्या लगेचच संपणार नाहीत. पण दिल्लीचे दीड कोटी लोक एकत्र आले, तर काहीही अशक्य नाही, अशी साद केजरीवाल यांनी उपस्थितांना घालताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
सत्ता मिळवली असली तरी भ्रष्ट नोकरशाही काम करू देणार नाही, अशी भावना ‘आप’च्या समर्थकांनी व्यक्त केली होती. त्यावर केजरीवाल म्हणाले की, सारेच अधिकारी भ्रष्ट नाहीत. प्रामाणिक अधिकाऱ्यांना सोबतीला घेत मार्गक्रमण करावयाचे आहे. सरकार चालवताना गाफील राहू नका, असा संदेश त्यांनी स्वपक्षीय आमदारांना दिला. सत्तेचा गर्व, अहंकार बाळगू नका. अन्यथा जसे प्रस्थापितांचे गर्वहरण करण्यासाठी ‘आप’ जन्माला आला तसाच नवा पक्ष आपल्या विरोधात निर्माण होईल. काम करताना सेवाभाव कायम ठेवा. आपण जनतेचे सेवक आहोत, याचा विसर कधीही पडू देऊ नका, असे ते म्हणाले.
‘लाल दिवा’ वापरणार नाहीत
आम आदमी पार्टीच्या सरकारने गाडीवर लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली सरकारचा कोणताही मंत्री अथवा अधिकारी लाल दिव्याचा वापर करणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अधिकाऱ्याला वैयक्तिक सुरक्षा अथवा सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा गाडय़ांचा ताफाही पुरविण्यात येणार नाही, असेही बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले.
‘वंदे मातरम्’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, गिरीश सोनी, सत्येंद्र जैन व राखी बिर्ला यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वच मंत्र्यांनी हिंदीतून शपथ घेतली. एरव्ही नायब राज्यपाल केवळ शपथेची सुरुवात करून देतात.या वेळी नजीब जंग यांनी संपूर्ण शपथ दिली. राखी बिर्ला यांचा अपवादवगळता प्रत्येक मंत्र्याने थेट शपथ घेण्यास प्रारंभ केला. राखी बिर्ला यांनी शपथ घेण्यापूर्वी ‘भारत माता व वंदे मातरम्’चा जयजयकार केला.
“आज प्रत्येक दिल्लीकराने सत्तास्थापनेची शपथ घेतली आहे. सामान्य माणूस केवळ बाता मारत नाही तर तो करून दाखवू शकतो, असा संदेश ‘आप’च्या विजयाने देशाला दिला.”
अरविंद केजरीवाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा