गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना दिलेला भारतरत्न हा किताब काढून घ्यावा, अशी मागणी भाजप खासदार चंदन मित्रा यांनी केल्यानंतर वाद सुरू झाला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले तर हा पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे सेन यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळातच अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते आपल्याला हा किताब मिळाला हे कदाचित मित्रा यांना माहीत नसावे, असा टोला त्यांनी लगावला. अशी मागणी येते ही दुर्दैवाची बाब असून ते मित्रा यांचे वैयक्तिक मत आहे, असे अमर्त्य सेन म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कालखंडात आपण अनेक वेळा लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह आणि अरुण जेटली यांच्याबरोबर चर्चा केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
भारतरत्न पुरस्कार मिळवलेली ही व्यक्ती आपल्या देशाचा मतदारही नाही, ती व्यक्ती एखाद्या पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात कशी बोलू शकते, असा सवाल चंदन मित्रा यांनी केला होता. भाजपने मात्र चंदन मित्रा यांचे मत व्यक्तिगत असल्याचे सांगत हात झटकले. असा वाद निर्माण करणे चुकीचे असल्याचे भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
चंदन मित्रा यांची ही मागणी म्हणजे भाजपची हुकूमशाही प्रवृत्तीची मानसिकता यातून दिसून येते, असे टीकास्त्र माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाजपचा विश्वास आहे की नाही, असा प्रश्नही तिवारी यांनी विचारला आहे.