भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरु आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अभिनंदन यांचे शहर बंगळूरूतील काही तरुणांनी त्यांच्या स्टाईलच्या मिशा ठेवल्या आहेत. याद्वारे त्यांनी त्यांच्या शौर्याला अनोख्या पद्धतीने जणू सलामच ठोकला आहे.


अभिनंदन यांच्या मिशांची सध्या नेटकऱ्यांमध्ये आणि कट्ट्यांवरही चर्चा सुरु आहे. शनिवारी बंगळूरूतील एका तरुणाने आपल्या जवळच्या सलूनमध्ये जाऊन आपल्याला अभिनंदन लूक ठेवायचा असल्याचे सांगत तसा लूक करुन घेतला. ३२ वर्षीय चांद मोहम्मद असे या तरुणाचे नाव आहे. अभिनंदन हे देशाचे बहादूर जवान असून त्यांच्या मिशा या शौर्याचे प्रतिक आहे. शाहरुख खान आणि सलमान खान माझे स्टाईल गुरु आहेत, मात्र आता अभिनंदनही त्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

या सलूनचे मालक समीर खान म्हणाले, आमच्याकडून जवळपास १५ तरुणांनी अभिनंदन यांच्याप्रमाणे आपल्या मिशा ट्रिम करुन घेतल्या आहेत. तरुण अशा प्रकारे आपल्या जवानाची स्टाईल कॉपी करीत आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अभिनंदनचा एक निस्सिम चाहता बनलेल्या अब्बास मस्तानने म्हटले की, मिशीचा असा लूक ठेऊन आम्ही आपल्या हवाई दलाला आपला पाठिंबा दर्शवत आहोत.

विशेष म्हणजे काही सलूनमध्ये तर अभिनंदन यांच्या स्टाईलमध्ये मिशी ठेवण्यासाठी ५० टक्के सूटही जाहीर करण्यात आली आहे. तर एका सलूनच्या व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांच्या सलूनमध्ये तरुणांना असा लूक मोफत करुन दिला जात आहे.

बंगळुरूमधील रामकुमार नावाच्या एका मध्यमवयीन गृहस्थांनीही आपल्या मिशा अशा प्रकारे करुन घेतल्या आहेत. अभिनंदन यांची शुक्रावारी रात्री पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर आपल्याला खूपच आनंद झाला. मात्र, त्यानंतर शनिवारी सकाळी आपण पाहिले की, काही तरुणांनी त्यांच्यासारखा लूक ठेवण्यास सुरु केली आहे. त्यानंतर मी देखील ठरवले की, आपणही अशीच मिशी ठेवायची.

Story img Loader