Chennai own Breaking Bad: अमेरिकेतली ब्रेकिंग बॅड ही वेबमालिका त्यातील वॉल्टर वाईट का पात्रामुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती. रसायनशास्त्र विषय शिकविणारा वॉल्टर वाईट पैशांसाठी स्वतः उच्च दर्जाचे अमली पदार्थ बनविण्याच्या कामात गुंततो आणि हळुहळु तो गुन्हेगारीच्या दलदलीत रुतत जातो. अट्टल गुन्हेगारांनाही लाजवेल इतके हिंसक आणि हिणकस कृत्य वॉल्टरच्या हातून एकामागोमाग घडत जातात. ब्रेकिंग बॅड सारखी खऱ्या आयुष्यातील घटना चेन्नईमध्ये घडली आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून ते अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. चेन्नईमध्ये एक गुप्त प्रयोगशाळा थाटून ते अमली पदार्थाची निर्मिती करत होते.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जण हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तर एका आरोपीने रसायनशास्त्रात चेन्नईच्या नामांकित महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच या आरोपीने विज्ञान शाखेच्या कोर्समध्ये सुवर्णपदकही जिंकलेले आहे, अशी माहिती मिळत आहे.

पदवीधर झालेल्या तरुणांचा एक गट अरुण कुमार नावाच्या व्यक्तीकडून अमली पदार्थ विकत घेऊन नंतर ते इतर लोकांना विकण्याचे काम करत होता. त्यानंतर आपणच अमली पदार्थाची निर्मिती करू, असा विचार विद्यार्थ्यांनी केला. यासाठी त्यांनी रसायनशास्त्रात पारंगत असलेल्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याला आपल्या कटात सामील केले. अमली पदार्थ बनविण्यासाठी त्यांनी कच्च्या मालाचीही जुळवाजुळव केली होती.

अटक झालेल्या आरोपींपैकी एकाने सांगितले की, त्याने आपल्या पालकांकडे कॉफी शॉप उघडण्यासाठी पैसे मागितले. आपला मुलगा उद्योग सुरू करतोय, या भावनेने त्याच्या पालकांनी कर्ज काढून त्याला पैसे उपलब्ध करून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांच्या प्रयोगशाळेवर धाड टाकली तेव्हा तिथे २४५ ग्रॅम्सचे मेथामाफेटामीन अमली पदार्थ आढळून आले. तसेच दोन लॅपटॉप आणि सात मोबाइल फोनही याठिकाणाहून जप्त करण्यात आले आहेत. यावेळी पाच अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि एका रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. पोलिस आता अरुण कुमार आणि कार्तिक नावाच्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत. या दोघांचाही अमली पदार्थ्याच्या व्यापारात सहभाग असल्याचे सांगितले जाते.