पीटीआय, हैदराबाद
शोषण-अन्यायाविरुद्ध कविता-गीतांतून क्रांतिकारी-बंडखोर विचारांच्या ठिणग्या पाडणारे तेलंगणमधील सुप्रसिद्ध लोककवी बालादीर ‘गदर’ यांचे रविवारी प्रकृती अस्वास्थामुळे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गदर यांची गीते १९८० च्या दशकात तसेच वेगळय़ा तेलंगण राज्याच्या मागणीच्या आंदोलनात लक्षवेधी ठरली होती.
गदर यांचे मूळ नाव गुम्मादी विठ्ठल राव असे आहे. येथील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयात त्यांच्यावर फुप्फुस आणि मुत्राशयाच्या विकारांवर उपचार सुरू होते. तीव्र हृदयरोगामुळे त्यांना २० जुलै रोजी तेथे दाखल केले होते. त्यांच्यावर ३ ऑगस्टला बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून ते बरे झाले होते, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री आणि तेलंगण भाजपचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी, टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी गदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्दांजली वाहिली. गदर हे २ जुलै रोजी खम्मम येथील राहुल गांधींच्या सभेला उपस्थित होते.
नक्षलवादातून मुख्य प्रवाहात
एकेकाळी नक्षलवादी चळवळीत असलेले गदर अनेक वर्षे भूमिगत होते. त्यानंतर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. त्यानी प्रथमच २०१८ मध्ये तेलंगण विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते.