नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीमध्ये स्थान न मिळालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. याची दखल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली असून पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. असे असले तरी दबावापुढे न झुकण्याची भूमिका पक्षनेतृत्वाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. सत्ता टिकविण्याचे आव्हान असताना पक्षाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील नाराजी उघड होऊ लागली आहे. शेट्टर यांच्यासह उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री एस. अंगारा, आमदार रघुपती भट, विधान परिषदेतील आमदार आर. शंकर नाराज झाले आहेत. याची दखल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दखल घ्यावी असून नड्डा आणि अमित शहा यांच्यात बुधवारी प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी नव्या चेहऱ्यांना दिलेल्या संधीचे महत्त्व मतदारांपर्यंत पोहोचवा, असा संदेश कर्नाटकमधील नेत्यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बंडखोरांपुढे न झुकण्याची केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. ‘‘भाजप नवनवे प्रयोग करत असल्यामुळे हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ५२ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल,’’ अशी असे पक्षाचे महासचिव व चिकमंगळुरूचे उमेदवार सी. टी. रवी यांनी सांगितले.
सर्व नाराज नेत्यांशी चर्चा सुरू आहे. पक्षानेच त्यांना आमदार आणि नेते बनविले आहे. सर्व नेत्यांना कायमच सन्मानाने वागविले गेले असून यापुढेही तसाच सन्मान मिळेल. त्यांच्या राजकीय भवितव्याचीही पक्षाकडून काळजी घेतली जाईल.
– बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री, कर्नाटक