युक्रेनमध्ये रशिया समर्थक बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सार्वमत घेतले असून, त्यात मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे. दरम्यान रशियाने बंडखोरांच्या या सार्वमताला पाठिंबा देत असल्याचे वक्तव्य क्रेमलिनच्या माध्यमातून करीत आगीत तेल ओतले आहे.
पाश्चिमात्य देशांनी मात्र हे सार्वमत म्हणजे नाटकबाजी असून ते बेकायेदशीर आहे असा दावा केला आहे. एकूण ८९ टक्के लोकांनी मतदान केले असून ते डोनेस्क प्रांतातील स्वयंशासनाच्या बाजूने आहे. एकूण दोन प्रांतांत मतदान झाले असून त्यातील डोनेस्क हा एक प्रांत आहे असे स्वयंघोषित निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले.
१० टक्के लोकांनी विरोधात मतदान केले व ७५ टक्के लोकांनी मतदान केले असे या आयोगाचे प्रमुख रोमान लायगिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याला अंतिम निकाल मानायला हरकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ल्युगान्स्क प्रांतातील निकालाबाबत सध्या काहीच सांगण्यात आलेले नसले तरी तेथेही लोकांनी स्वयंशासनाच्या बाजूने मतदान केले आहे. कदाचित डोनेस्कपेक्षा जास्त लोकांनी हे मतदान केले असावे असे मत व्यक्त करण्यात आले.
दोन प्रांतांत ७० लाख लोक असून युक्रेनची लोकसंख्या एकूण ४.६ कोटी आहे. पाश्चिमात्य देशांना अशी भीती वाटते, की युरोपच्या पूर्वेला यादवी युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. पूर्व-पश्चिम संबंध त्यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या निष्कर्षांबाबत तटस्थेने जाणून घेण्याबाबत काही व्यवस्था नाही. बंडखोरांनी परदेशी माध्यमांनी मतदानाचे निरीक्षण करण्यास मज्जाव केला होता. तेथे निरीक्षक नव्हते.

Story img Loader