अफगाणिस्तानातील तालिबानच्या निर्दयी राजवटीला मान्यता देण्याचा पाकिस्तानचा निर्णय ही घोडचूक होती, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी मान्य केले आहे. मात्र अल-कायदाच्या उदयाला पाश्चिमात्य देश आणि अमेरिका जबाबदार असल्याचेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला १९९६ ते २००१ पर्यंत मान्यता देणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनेही कालांतराने माघार घेतली होती, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. तालिबानच्या राजवटीला मान्यता दिल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी मुशर्रफ यांनी, पाकिस्तानकडून घोडचूक झाल्याचे मान्य केले.
सोव्हिएतने १९७९ मध्ये अफगाणिस्तानवर आक्रमण केले त्यामुळे जागतिक पातळीवर राजकीय वातावरणात बदल झाले. त्यानंतर अमेरिकेने तीन घोडचुका केल्या, असेही मुशर्रफ म्हणाले. सोव्हिएतने माघार घेतल्यानंतर अमेरिका त्या प्रांतातून बाहेर पडली.
अफगाणिस्तानच्या २५ हजार मुजाहिद्दीनांचे पुनर्वसन न केल्याने सदर मुजाहिद्दीन त्यानंतर पाकिस्तानात आले आणि त्यामुळे अल-कायदा स्थापन झाली. तालिबानला मान्यता देण्यास पाश्चिमात्यांनी दिलेला नकार आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘नॅटो’ फौजांनी अफगाणिस्तानावर केलेले आक्रमण या तीन घोडचुका होत्या, असेही ते म्हणाले.
त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये संतुलित सरकार येणे गरजेचे होते, परंतु तसे न झाल्याने २००३ पासून तालिबानचे पुनरुज्जीवन झाले. पोषक वातावरणामुळे तालिबान स्वयंनिर्मित झाले, असेही ते म्हणाले. तालिबानला आम्ही जन्म दिला, त्याची आम्ही निर्मिती केली असे काही जण म्हणतात, मात्र त्यामध्ये तथ्य नाही, असेही मुशर्रफ म्हणाले.

Story img Loader