नागालॅण्ड आणि मेघालयात शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांचा मतदानाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले. मेघालयात ८८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले, तर नागालॅण्डमध्ये ८३.२७ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले.
मेघालयातील सात जिल्ह्य़ांमध्ये बंडखोरांनी बंद पुकारला असतानाही तो झुगारून मतदानाच्या पहिल्या पाच तासांतच ५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. नाईक यांनी सांगितले. खासी जैंतिया डोंगरी भागात ३६ तासांचा बंद पुकारण्यात आला असला, तरी तेथे मतदारांचा उत्साह अधिक असल्याचे आढळले.
आंतरराष्ट्रीय आणि आतरराज्यीय सीमेवर आणि संवेदनक्षम म्हणून घोषित करण्यात आलेल्या ९०० मतदार केंद्रांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बंद पुकारण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर सरकारच्या वतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअंतर्गत १०० वाहने सज्ज ठेवण्यात आली होती. मुकुल संगमा, डी. डी. लापांग आणि एस. सी. मरक या काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह चार माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
दरम्यान, नागालॅण्डमध्ये काँग्रेसचे उमेदवार पी. चुबा चांग यांचे निधन झाल्याने तुअेनसांग मतदारसंघातील मतदान स्थगित करण्यात आले. राज्यात मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी उमेदवारांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात किरकोळ स्वरूपाची बाचाबाची झाली. वोखा आणि मोन जिल्ह्य़ांत मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान विलंबाने सुरू झाले. मतदान केंद्रांना १०० टक्के सुरक्षा पुरविण्यासाठी निमलष्करी दलाचे २५ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.