कॅनडामध्ये उन्हाच्या तीव्रतेने लोक त्रस्त आहेत. कॅनडात मंगळवारी सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले. हवामान खात्याने ही माहिती दिली. तसेच उष्माघाताने २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडामध्ये ४९.५ डिग्री सेल्सिअस पर्यंत सर्वोच्च पातळी नोंदविली गेली आहे.

कॅनडामध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील व्हँकुव्हर प्रदेशातील बरेच मृत्यू हे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे झाले असल्याची शक्यता आहे. कॅनडात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम किनारपट्टी प्रांतात शुक्रवार आणि सोमवारदरम्यान किमान २३३ लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.

हेही वाचा- भारताची Covaxin करोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी- अमेरिकन अभ्यास

व्हँकुव्हर पोलीस खात्याने सांगितले की, शुक्रवारपासून अचानक अशा ६५ मृत्यूची माहिती मिळाली आहे, त्यातील बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे संबंधित आहेत.

मंगळवारी कॅनडात सलग तिसर्‍या दिवशी तापमानाने नवीन उच्चांक गाठला. देशाच्या हवामान खात्यानुसार, व्हँकुव्हरपासून २५० कि.मी. अंतरावर ब्रिटिश कोलंबियाच्या लेटॉन येथे पारा ४९.५. डिग्री सेल्यियस पर्यंत पोहोचला. “व्हँकुव्हरने यापूर्वी कधीच येवढ्या उष्णतेचा अनुभव घेतला नव्हता आणि त्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे,”असे पोलीस सार्जंट स्टीव्ह एडिसन यांनी सांगितले. तसेच इतर स्थानिक नगरपालिकांचेही म्हणणे आहे की, लोकांच्या अचानक मृत्यूविषयीही त्यांना माहिती मिळाली आहे.