देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील एक किस्सा सांगितला आहे. मागील वर्षी अफगाणिस्तानमध्ये सुरु झालेल्या तालिबान विरुद्ध सरकार युद्धाच्या दरम्यान भारतीयांना अफगाणिस्तानमधून सुखरुप परत आणण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेच्या काळातील हा किस्सा होता. मध्यरात्रीनंतर पंतप्रधान मोदींचा आपल्याला फोन आला होता त्यावेळी त्यांनी फोन केल्यानंतर पहिला प्रश्न काय विचारला यासंदर्भात जयशंकर यांनी या भाषणात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल किती तत्पर आहेत यासंदर्भातील माहिती देताना परराष्ट्रमंत्र्यांनी हा किस्सा सांगितला.
भारताने अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरु केलेलं मदतकार्य सुरु असतानाच एके रात्री पंतप्रधान मोदींचा परराष्ट्रमंत्र्यांना मध्यरात्रीनंतर फोन आला होता. हाच किस्सा सांगताना जयशंकर यांनी, “मला अजूनही आठवतं की एकदा मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला होता. हल्ले सुरु असणाऱ्या अफगाणिस्तानमधील आमच्या मजार-ए-शरीफमधील दुतावासामध्ये मी फॉर्म भरुन घेत होतो. काय सुरु आहे हे समजून घेत होतो. ती वेळ अशी होती की तिथल्या स्थानिकांनी चांगलं बोलून काम करुन घेण्याचा आमचा प्रयत्न होता. हे सारं सुरु असतानाच अचानक माझा फोन वाजला. सामान्यपणे पंतप्रधान फोन करतात तेव्हा कॉलर आयडी नसतो. मला तो फोन पाहून आश्चर्य वाटलं. मी नो कॉलर आयडीवर कोणीतरी आपल्याशी संपर्क साधू इच्छित असल्याचं वाटल्याने मी फोन उचलला,” असं सांगितलं.
“मी त्यांना ओळखेल असं त्यांनी गृहित धरलं होतं. त्यांचा पहिला प्रश्न होता जागा आहेस का? तर मी, ‘होय सर’ असं उत्तर दिलं. साडेबारा वाजले होते. आम्ही जिथे होतो तिथे इतर काय करणार. त्यांच्यासाठी ते (जागं राहणं) नैसर्गिक असेल. पुढे त्यांनी विचारलं, अच्छा टीव्ही पाहत आहात का? आम्ही त्यावर, होय सर टीव्ही पाहत आहोत असं उत्तर दिलं. त्यांनी पुढे विचारलं की तिथे काय घडत आहे? तेव्हा मी हल्ले सुरु आहेत, आपण मदत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय वगैरे सांगितलं,” असं तो किस्सा सांगताना जयशंकर म्हणाले. पुढे बोलताना जयशंकर यांनी मोदींनी काम झाल्यावर फोन करण्यासंदर्भात सांगितल्याचं म्हटलं. “अच्छा मग हे संपेल तेव्हा मला सांग असं ते म्हणाले. मी म्हटलं सर यात अजून दोन तीन तास लागतील. काम झाल्यानंतर मी तुमच्यापर्यंत निरोप पोहचवेन. त्यानंतर त्यांनी मध्ये एक क्षण विश्रांती घेतली आणि ते गंभीर आवाजात म्हणाले, मलाच फोन कर” असं जयशंकर यांनी सांगितलं.
“जे सरकारसाठी काम करतात, जे सार्वजनिक क्षेत्रात लोकांसाठी काम करतात, राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी असणाऱ्या त्यांच्या भावना मला त्यावेळी कळल्या. सध्याच्या बऱ्या वाईट काळात लोक त्यांच्यावर टीका करत असतात पण ते मदतीसाठी उपलब्ध असतात. राजकीय नेते चांगल्या वेळेला कायमच हजर असतात. पण कठीण काळात असं नसतं. आपण करोनाच्या काळात पाहिलं आहे की तुम्ही जगभरातील परिस्थिती पाहिलीय. प्रत्येकाने पुढे येऊन हे आव्हान स्वीकारलं नाही. जो काही निर्णय असेल माझा असेल असं फार कमी नेते म्हणाले. त्या काळात घेतलेल्या मोठ्या निर्णयाचे परिणामांना सामोरं जाण्याची धैर्य असणं हा फार मोठा गुण आहे असं मी मानतो,” असंही जयशंकर यांनी सांगितलं.