आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून लवकरच त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकते, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली.
मोदी यांच्याविरुद्ध यूपीए सरकारने मजबूत केस तयार केली नाही आणि त्यांच्याविरुद्धच्या कारवाईच्या मुद्दय़ावर ते केवळ लोकांची दिशाभूल करत राहिले, असा आरोपही त्यांनी केला.
यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त ‘फेमा’ चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी ‘लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. असे असताना लंडनमध्ये बसलेल्या कुणा व्यक्तीला परत कसे आणता येईल, असा प्रश्न राठोड यांनी विचारला.
आयपीएलमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांमधील सहभागाबद्दल ललित मोदी यांच्याविरुद्ध मुंबईच्या एका न्यायालयाने गेल्या आठवडय़ात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.
यापूर्वीच्या सरकारने ललित मोदी प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली नाही. एनडीए सरकारच या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असून, त्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाण्याची दाट शक्यता असल्याचे राठोड यांनी पत्रकारांना सांगितले.
काँग्रेसच्या आरोपांबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी
या प्रकरणात त्यांची भूमिका यापूर्वीच संसदेत मांडली असून, आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट केली आहे. तरीही काँग्रेसने संसदेचे कामकाज होऊ न देता फार मोठय़ा सार्वजनिक निधीचा अपव्यय केला, असेही राठोड म्हणाले.

Story img Loader