अत्यंत घातक अशा एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली.
देशातील बालमृत्यूचे प्रमाणही घटत असून, एचआयव्हीबाधित रुग्णांच्या संख्येतही ५७ टक्क्य़ांनी घट झाली आहे, असे आझाद यांनी सांगितले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आयोजिलेल्या ‘भारतीय आरोग्य परीषदे’त ते बोलत होते.
पोलिओमुक्त भारताचे स्वप्न आता साकार झाले असून सलग दुसऱ्या वर्षी भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही, असे सांगत आरोग्य क्षेत्रांतील आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एचवन एनवनसारख्या रोगावरही मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस शोधण्याचा प्रयत्न सुरू असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा (आयसीएमआर) यात मोलाचा वाटा आहे, असे आझाद यांनी नमूद केले.
रोगनिदान तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर सध्या आयसीएमआर संशोधन करीत असल्याचे ते म्हणाले.
आगामी काळात एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा अनुक्रमे ४० आणि ८० टक्क्य़ांनी वाढविण्यात येणार असल्याची माहितीही आझाद यांनी दिली.                               
आकडेवारी / नोंदी
देशातील एड्सची लागण झाल्याची पहिली नोंद १९८६ मधील.
निम्मा दक्षिण भारत आणि सुदूर ईशान्य भारतात प्राबल्य.
एचआयव्हीग्रस्तांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या सहा राज्यांची नावे व आकडेवारी मणिपूर (१.४०%)
आंध्र (०.९०%)
मिझोराम (०.८१%)
नागालँड (०.७५%)
कर्नाटक (०.६३%) महाराष्ट्र (०.५५%)
केंद्र सरकारी संकेतस्थळावरून

Story img Loader