नवी दिल्ली : देशाची जीवनरेषा मानली गेलेली रेल्वे यंत्रणा अतिदक्षता विभागात भरती झालेली आहे, तिला कृत्रिम श्वसनावर जगवावे लागत आहे. पण, रेल्वे मंत्रालय मात्र ‘रील’ तयार करवण्यात मग्न झालेले आहे. इन्स्टाग्रामवर ‘रील’ तयार करून रेल्वेची अवस्था सुधारणार नाही, असा घणाघाती शाब्दिक हल्ला सोमवारी लोकसभेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह शिवसेना-ठाकरे गट, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांनी केला.
लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी, ‘वंदे भारत’चे कौतुक करून देशातील रेल्वे यंत्रणेचे खरे चित्र समजू शकत नाही, असे सांगितले. सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासात मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईच्या लोकल रेल्वेची स्थिती रेल्वेमंत्र्यांनी स्वत: प्रवास करून पाहिली पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी विरार ते चर्चगेट आणि कल्याण ते सीएसटी प्रवास मुंबईकर कसा करतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे, असे गायकवाड म्हणाल्या.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकल रेल्वेगाड्यांच्या महिलांच्या डब्यांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यांनी केली. कोकण रेल्वेचा कोकणातील स्थानिक रहिवाशांना फायदा होत नाही. दादर-सावंतवाडी रेल्वेगाडी बंद झाली पण, गोरखपूरला जाणाऱ्या दोन रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. रेल्वेमध्ये नोकरभरती केली जात नाही, असाही मुद्दा सावंत यांनी मांडला. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला नानाशंकर शेठ यांचे नाव देण्याची मागणीही सावंत यांनी केली.
दरम्यान, राज्यसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, २००५-०६च्या तुलनेत रेल्वे अपघातांचे प्रमाण ९० टक्के कमी झाल्याचा दावा केला. सध्या रेल्वेमध्ये १२ लाख कर्मचारी काम करत असून त्यातील ४० टक्क्यांची भरती गेल्या १० वर्षांमध्ये झालेली आहे, अशी माहिती दिली.
गेल्या आठ महिन्यांमध्ये २९ रेल्वे अपघात झाले, ३१३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तरीही रेल्वे मंत्रालय काहीच कसे शिकत नाही? रेल्वेमंत्री ‘सुरक्षा कवच’बद्दल सातत्याने बोलत असतात पण, रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेचे काय होत आहे याकडे कधी बघणार? माजी रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींनी एक अपघात झाल्यावर राजीनामा दिला होता, आता रेल्वेमंत्र्यांनाच ‘सुरक्षाकवच’ पुरवले जात आहे. – वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस</p>
गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वे सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सेमी हाय-स्पीड नंतर आता देशात बुलेट रेल्वे चालवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय रेल्वे ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, स्पेन आणि रोमानिया यासारख्या देशांना डब्यांपासून इंजिनपर्यंत अनेक भागांची निर्यात करत आहे. – अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
विरोधकांचे मुद्दे
● रेल्वेगाड्यांमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध नसते
● वातानुकुलित डब्यांमध्ये छतातून पाणी गळते
● शौचालयांची अवस्था वाईट
● रेल्वे स्थानकांवरील फलाट अस्वच्छ, तुडुंब गर्दी
● रेल्वेगाड्यांना १० ते १२ तास विलंब, पण प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय नाही
● अफवा पसरून चेंगराचेंगरीमध्ये लोकांचा मृत्यू
● रेल्वे यंत्रणेची अवस्था दयनीय असतानाही रेल्वेमंत्र्यांचे मौन
रेल्वेच्या खासगीकरणाची शंका: एमटीएनएल, बीएसएनएल, एअर इंडिया या सगळ्या सरकारी कंपन्या तोट्यात गेल्या, काही कंपन्यांचे खासगीकरण झाले तसेच रेल्वेचे केंद्र सरकारला खासगीकरण करून ती ‘मित्रां’च्या स्वाधीन करायची आहे का, असा सवाल विरोधकांनी केला.