दिल्लीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने तिथे पुन्हा नव्याने निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना पुन्हा निवडणूक घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मात्र, या पक्षाला ३२ जागांवरच विजय मिळाला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ३६ सदस्यांची गरज आहे. दुसऱया क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाकडे २८ सदस्य आहेत. दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले असून, सत्ताधारी कॉंग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले.
आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सोमवारी संध्याकाळी होणार आहे. त्यामध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेतला जाईल. आम आदमी पक्ष भाजप किंवा कॉंग्रेस दोघांपैकी कोणालाही पाठिंबा देणार नाही. त्याचबरोबर त्यांचा पाठिंबा स्वीकारणारही नाही, असे मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केले. जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्य़ाशिवाय पर्याय नाही, असेही सिसोदिया म्हणाले.
दरम्यान, आम आदमी पक्षाचा नैतिक, राजनैतिक विजय झाला असला, तरी तांत्रिकदृष्ट्या आमच्याकडे बहुमत नसल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले. सर्वाधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वात आधी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेत. त्यांच्या प्रयत्नांनंतरच आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

Story img Loader