दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला भारत-चीन यांच्यातील सीमेबाबतचा वाद निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) पाठवावा, अशी सूचना माजी कायदामंत्री व राज्यसभेचे खासदार राम जेठमलानी यांनी नरेंद्र मोदी सरकारला केली आहे.
ही लढाई आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावी लागणार असून, मोदी यांच्या चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आपण त्यांना तशा आशयाचे छोटेखानी पत्र लिहिले असल्याचे जेठमलानी यांनी गुरुवारी रात्री एका कार्यक्रमात सांगितले. या समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी हा मार्ग असून, सरकारने ही सूचना मान्य केल्यास मी भारतातर्फे युक्तिवाद करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.
सीमावादावर आम्हाला चीनशी युद्ध नको आहे, तर कायदेशीर मार्गाने शांततामयरीतीने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत नामवंत सिंधी लेखकांना साहित्यविषयक पुरस्कार देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेले जेठमलानी यांनी व्यक्त केले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह इतिहासात चीनला भेट दिलेल्या कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने या मुद्दय़ावर ठोस परिणाम साधला
नाही, असे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या दौऱ्याचा उल्लेख न करता सांगितले.

Story img Loader