पीक कापणीला नकार दिला म्हणून गावातील वरच्या जातीमधील ठाकूरांनी सीताराम वाल्मीकि या दलिताला बेदम मारहाण करुन त्याला मूत्रप्राशन करायला भाग पाडले. उत्तर प्रदेशातील बदायूमधील आझमपूर बिसौरीया गावात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार २३ एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास विजय सिंह, पिंकू सिंह, शैलेंद्र सिंह आणि विक्रम सिंह हे गावातील ठाकूर सितारामला भेटले. सिंह कुटुंबाने सितारामला त्यांच्या २० बिघा जमिनीवर पीक कापणी करण्यास सांगितली. पण प्रकृती खराब असल्याने सितारामने नकार दिला.
सितारामच्या नकाराने संतापलेल्या ठाकूरांनी त्याला मारहाण सुरु केली व त्याला अपशब्द सुनावले. त्यांनी सितारामला खेचत गावाच्या चौपालवर आणले व झाडाला बांधले. त्यानंतर त्याला जबरदस्तीने मूत्रप्राशन करायला भाग पाडले असे सितारामची पत्नी जयमालाने सांगितले. मी आणि माझा १४ वर्षांचा मुलगा प्रमोद हात जोडून सितारामला सोडण्याची विनंती करत होतो. पण ठाकूर काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी आम्हाला उलट सुनावलं, कोण आहे तुमचं?, आमच सरकार आहे असे ते बोलत होते अशी माहिती जयमालाने दिली.
जयमालाने शंभर क्रमांकावर फोन लावून पोलिसांकडेही मदत मागण्याचा प्रयत्न केला. पोलीस तिथे आल्यानंतर त्यांनी सितारामची सुटका केली व ठाकूरांना तिथून जाण्यास भाग पाडले. त्याच रात्री आमच्या घरावर पुन्हा हल्ला झाला. त्यावेळी आम्ही पुन्हा पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सिताराम आणि विजय सिंहला कलम १५१ अंतर्गत अटक केली असे सितारामचा लहान भाऊ अनबीर वाल्मीकिने सांगितले.
रात्र तुरुंगात काढल्यानंतर जामिनावर पोलिसांनी सितारामची सुटका केली. पोलिसांनी सुद्धा आपल्या मुलाला मारहाण केली असे सितारामचे वडिल राम गुलाम यांनी सांगितले. या प्रकरणात चार आरोपींना सोमवारी अटक केली असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे असे बदायूचे एसएसपी अशोक कुमार शर्मा यांनी सांगितले. हजरतपूरच्या एसएचओनेही तात्काळ कारवाई केली नाही म्हणून त्याला निलंबित केले आहे.
या प्रकरणी २९ एप्रिलला एफआयआर दाखल झाला असून आता सितारामच्या घराबाहेर पोलीस पहारा बसवण्यात आला आहे. सितारामने ६ हजार रुपये अॅडव्हान्समध्ये घेतले होते असा ठाकूरांचे म्हणणे आहे असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दिवसभर सिताराम बेपत्ता होता. तो कुठे होता कुणालाही माहित नाही.