केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच कोविन अॅपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
स्पुटनिकचाही पर्याय असणार उपलब्ध!
नुकतीच केंद्र सरकारने देशात परदेशी लसींच्या वितरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक या लसींचे डोस देखील भारतात लवकरच वितरीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये रशियाची स्पुटनिक व्ही ही लस देखील काही लसीकरण केंद्रांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं आहे. मात्र, फायझर आणि मॉडेर्ना या लसींबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
“१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन!
कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?
1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा
३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा
४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.
६. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.
१ मेपासून कोविशिल्डची किंमत वाढली!
गेल्या काही दिवसांमधअये केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप तो निर्णय घेण्यात आलेला नाही. बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.