दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रथम अटक करण्यात येऊन त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे जामिनावर मुक्तता करण्यात आलेले डीआरडीओ या संस्थेतील शास्त्रज्ञ अझीझ अहमद मिर्झा यांच्याविरोधात पुरावे नसतील तर त्यांना सेवेत रुजू करून घेण्यात यावे, अशी सूचना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केली.
राष्ट्रीय तपास संस्थेने मिर्झा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले नव्हते. हा धागा पकडत, जर मिर्झा यांच्याविरोधात पुरावे नसतील तर त्यांना कामावर पूर्वीप्रमाणे रुजू करून घ्यावे आणि त्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंती संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना लिहिलेल्या पत्रात काटजू यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी मिर्झा यांची जी बदनामी झाली त्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने अझीझ अहमद मिर्झा यांची जाहीर माफी मागावी, अशी सूचनाही काटजू यांनी केली आहे.
 अझीझ अहमद मिर्झा यांच्याविरोधात पुरावे नसतानाही त्यांच्यावर कारवाई केली गेली असेल तर, भारतभर सर्वच मुस्लीम व्यक्ती दहशतवादी असतात, असा  चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली.

Story img Loader