केरळमधील एका महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी महिला तब्बल २७ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होती. पोलिसांना चकमा देण्यसाठी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाव बदलून राहत होती. या काळात ते कोट्टायमवरून तमिळनाडू आणि तिथून कोट्ठामंगलम आणि त्यानंतर आदिवाड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ती राहिली. ही ‘हुशार’ खुनी महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी तिला रविवारी ताब्यात घेतलं.
मूळची मवेलिक्कारा येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय अचम्मा उर्फ रेजी हिला आदिवाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. आदिवाड येथे ती मिनी राजू या नावाने राहत होती. ११ सप्टेंबर १९९६ रोजी तिला केरळ उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ती फरार होती.
अचम्माचा पोलिसांकडे केवळ एकच फोटो होता जो १९९० मध्ये एका स्थानिक वर्तमान पत्रात छापून आला होता. अचम्मा उर्फ रेजी हिला १९९० मध्ये केलेल्या हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. मावेलिक्करा येथील मरियम्मा या ६१ वर्षीय महिलेचा तिने खून केला होता. हा खून केला तेव्हा अचम्मा केवळ १८ वर्षांची होती. तिने स्वयंपाकघरातल्या चाकूने मरियम्माचा खून केला होता.
चेंगन्नूरचे पोलीस उपअधीक्षक एमके बिनुकुमार यांनी सांगितलं की, रेजी उर्फ अचम्मा आदिवाड येथे मिनी राजू या नव्या नावाने राहत होती. ती तिथल्या एका कपड्याच्या दुकानात कर्मचारी म्हणून काम करत होती. २१ फेब्रुवारी १९९० रोजी मरियम्मा यांचा रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या घरात आढळला होता. अचम्माने त्यांचा खून केला होता. तिने मरियम्माचा कानही कापला होता. मरियम्माला मारून अचम्माने त्यांच्या गळ्यातले आणि कानातले सोन्याचे दागिने लुटले होते.
हा खून करून पळून गेलेल्या रेजीला (अचम्मा) त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु १९९३ मध्ये मावेलिक्कारा जिल्हा सत्र न्यायालयाने तिला निर्दोष मुक्त केलं. त्यानंतर मरियम्माच्या कुटुंबियांनी रेजीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर १९९६ रोजी रेजीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
फरार झाल्यावर रेजीने नवा संसार थाटला
कोर्टाने शिक्षा सुनावली त्यादरम्यानच रेजी फरार झाली. ती या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या राज्यातून त्या राज्यात अशी लपत राहिली. परंतु पोलीस तिला पकडू शकले नाहीत. रेजी सतत तिच्या निवासाची जागा बदलत राहिली. या काळात तिने तिची नावंदेखील बदलली. २७ वर्षांपासून ती पोलिसांना चकमा देत होती. १९९६ पासून फरार असलेल्या रेजीने १९९९ मध्ये थुकले येथील एका तरुणाशी लग्न केलं. तेव्हा ती कोट्टायम येथे लोकांच्या घरात घरकाम करायची.
हे ही वाचा >> भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, उत्तर प्रदेशातल्या देवबंदजवळ अज्ञातांकडून गोळीबार
लग्नानंतर काही वर्षांनी रेजी तिच्या पतीबरोबर तमिळनाडूला निघून गेली. ती बरीच वर्ष तिच्या पतीबरोबर तमिळनाडूत राहत होती. पाच वर्षांपूर्वी परत केरळमध्ये आली. यादरम्यान, अशी अफवा पसरली की, लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कोव्हिन पोर्टलवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या यादीत तसेच कोव्हिड लस घेतलेल्या लोकांच्या यादीत रेजीचं नाव सापडतंय का ते तपासलं, परंतु त्यातून काही हाती लागलं नाही. अखेर स्थानिक पोलिसांना रेजी उर्फ अचम्मा आदिवाड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.