Rekha Gupta and Delhi New Cabinet Ministers to take oath today : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (AAP) भारतीय जनता पक्षाने पराभव केला. यानंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. यादरम्यान भाजपाने धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांचे नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. आज त्यांचा शपथविधी होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपाच्या नेत्या गुप्ता यांच्यासह इतर सहा भाजपा नेते आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश शर्मा यांच्या वाट्याला काय येणार अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हे मंत्री घेणार शपथ
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते परवेश वर्मा, कपिल मिश्रा, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र राज, आशिष सूद आणि पंकज सिंग गुरुवारी दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
रेखा गुप्ता यांचा दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर त्यांचा शपथविधी समारंभ आज रामलीला मैदानावर होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी परवेश वर्मा यांचे नावही चर्चेत होते. राजधानी दिल्लीतील भाजपाचा जाट समाजाचा चेहरा असलेल्या परवेश वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि आपचे बडे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. त्यामुळे वर्मा यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पदाबाबत परवेश वर्मा काय म्हणाले?
दिल्लीच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना दिला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना परवेश वर्मा “पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी मी काळजीपूर्वक पार पाडेन”, असं उत्तर दिले आहे. परवेश वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी नेहमी म्हणत आलो आहे की, मी भाजपाचा समर्पित कार्यकर्ता आहे आणि मी तो नेहमीच राहिल. भाजपाने माझ्या वडिलांना दिल्लीचा मुख्यमंत्री बनवले आणि त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी पक्षाची सेवा केली. पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी टाकेल ती मी काळजीपूर्वक पार पाडेन,” असे वर्मा म्हणाले. .
तर तर कपिल मिश्रा, आशिष सूद, पंकज सिंग, रवींद्र राज आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनीही अनुक्रमे करावल नगर, जनकपुरी, विकासपुरी, बवाना आणि राजौरी गार्डन या जागांवर विजय मिळवला आहे. रेखा गुप्ता आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री आज रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात शपथ घेणार आहेत. त्यानंतर रेखा गुप्ता या आजपर्यंत दिल्लीला मिळालेल्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरतील. यापूर्वी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांनी हे पद सांभाळले आहे.
गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
रेखा गुप्ता यांनी शालिमार बाग मतदारसंघातून आपच्या उमेदवार वंदना कुमार आणि काँग्रेसचे उमेदवार परवीन कुमार जैन यांचा २९,५९५ च्या मताधिक्याने पराभव केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे