Rekha Gupta New CM Of Delhi: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर रेखा गुप्ता यांनी, पक्षाने त्यांना आशीर्वाद दिल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती देत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपाने पोस्ट करत म्हटले की, “दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपाला फायदा होईल असे मानले जात होते. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनतर दिल्लीची सत्ता भाजपाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट झाले होते. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.

कोण आहेत रेखा गुप्ता?

हरियाणातील जिंद जिल्ह्यात जन्मलेल्या रेखा गुप्ता ५० वर्षांच्या आहेत. रेखा गुप्ता यांचे कुटुंब १९७६ मध्ये दिल्लीला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर त्यांचे शिक्षण आणि राजकीय कारकिर्द दिल्लीतच घडली. रेखा गुप्ता यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले असून, त्या व्यवसायाने वकील देखील आहेत.