वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास संघटनेला इस्रायलचे उर्वरित सर्व ओलिस सोडण्यासाठी शेवटचा इशारा दिला. ‘हमास’शी थेट चर्चा करण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिशय निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हाइट हाउस’मध्ये ट्रम्प यांनी ‘हमास’ने सोडलेल्या आठ ओलिसांशी संवाद साधला. त्यानंतर ट्रम्प म्हणाले, ‘इस्रायलला त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व काही पाठवीत आहे.’ ‘हमास’ला उद्देशून ट्रम्प म्हणाले, ‘सर्व ओलिसांची आता, ताबडतोब सुटका करा. नंतर नाही. तसेच, तुम्ही ज्यांची हत्या केली आहे, त्या सर्वांचे मृतदेहही ताबडतोब परत करा. अन्यथा, तुमच्यासाठी आता सारे संपलेले असेल. केवळ विकृत लोक मृतदेह जवळ ठेवतात आणि तुम्ही विकृत आहात.’

अमेरिकी अधिकारी ‘हमास’बरोबर चर्चा करीत असल्याचे व्हाइट हाउसने बुधवारी सांगितले. त्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र शब्दांत ‘हमास’ला इशारा दिला. दहशतवादी गटाशी थेट चर्चा न करण्याच्या अमेरिकेच्या आतापर्यंतच्या धोरणाला ट्रम्प यांनी फाटा दिला. कतारमध्ये दोहा येथे ही चर्चा होत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने १९९७ मध्ये ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

तेव्हापासून हमास आणि अमेरिकेमधील ज्ञात असलेली ही पहिलीवहिलीच चर्चा आहे. चर्चेसंबंधी अधिक तपशील देण्यास व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लिएव्हिट यांनी नकार दिला. मात्र, अध्यक्ष ट्रम्प यांनी शिष्टमंडळातील प्रत्येकाला कुणाशीही बोलण्याचे अधिकार दिले असल्याचे त्यांनी सांगितले. इजिप्त आणि कतार यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत.

ट्रम्प यांनी ‘हमास’ने इस्रायलकडे सुपूर्द केलेल्या आठ ओलिसांशी ‘व्हाइट हाउस’मध्ये संवाद साधला.

मेक्सिकोवरील करसंकट तूर्तास टळले

मेक्सिकोच्या अध्यक्षांशी केलेल्या चर्चेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोतील बहुतांश वस्तूंवरील २५ टक्के कराचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी कॅनडा आणि मेक्सिको या दोन्ही देशांवरील कर ‘कदाचित’ पुढे ढकलले जातील असे संकेत दिल्यानंतर ट्रम्प यांनी यासंदर्भात घोषणा केली. करांचे पुनर्निर्धारण केल्यानंतर ट्रम्प यांनी एक महिन्यात दुसरी स्थगिती दिली आहे. यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडा अमेरिकेसोबत व्यापार युद्धात अडकण्याचा इशारा दिला होता.