ललित मोदी प्रकरणाबाबत यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात ब्रिटीश अधिकाऱयांशी केलेला पत्र व्यवहारच ललित मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर ठरेल. ब्रिटनच्या अधिकाऱयांनी हा पत्र व्यवहार प्रकाशित करावा, अशी मागणी करीत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ललित मोदी यांना टोला लगावला.
सुषमा स्वराज यांच्याबाबतचा वाद निर्माण होण्यास काँग्रेस जबाबदार असून भाजपशी असलेल्या राजकीय हाडवैरामुळे काँग्रेस पक्ष आणि पी.चिदंबरम यांच्याकडून मला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप ललित मोदी यांनी केला होता. ललित मोदींच्या या आरोपाच्या प्रत्युत्तरात पी. चिदंबरम यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळात ललित मोदी प्रकरणाबाबत ब्रिटनच्या कुलपतींना लिहीण्यात आलेली पत्रे प्रकाशित करण्याची मागणी केली. ललित मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांचे उत्तर या पत्रांमध्येच मिळेल, असा टोला चिदंबरम यांनी यावेळी लगावला.
दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री असतानाच्या काळात पी.चिदंबरम यांनी ललित मोदी प्रकरणाबाबत ब्रिटनच्या अधिकाऱयांना पत्र लिहीले होते. आयपीएलमधील आर्थिक गैरव्यवहार आणि सट्टेबाजी प्रकरणाचे आरोपी असलेले ललित मोदी कारवाईपासून पळ काढण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रयाला असल्याचे माहिती असूनसुद्धा त्यांच्यावर तुमच्याकडून कोणतीही कारवाई का होत नाही? अशी विचारणा पी.चिदंबरम यांनी ब्रिटनच्या अधिकाऱयांना पत्रातून केली होती. २०१३ साली ब्रिटनच्या कुलपतींसोबत झालेल्या बैठकीत देखील पी.चिदंबरम यांना हा मुद्दा उचलून धरला होता.

Story img Loader