२४ तासांपेक्षा जास्त वेळ अटकेत ठेवण्यात आले असेल, तर विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया आणि जगदगुरू रामभद्राचार्य यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले.
न्या. इम्तियाझ मुर्तझा आणि न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या पीठाने हा निर्णय दिला. सिंघल, तोगडिया आणि रामभद्राचार्य यांना ताब्यात का घेण्यात आले, यासंदर्भात मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १५१(२) नुसार जर या तिन्ही नेत्यांना अटक करण्यात आली असेल, तर त्यांची तातडीने सुटका करावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
या कायद्याप्रमाणे ताब्यात घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त वेळ अटकेत ठेवण्यात येत नाही. विश्व हिंदू परिषदेच्या या नेत्यांची सुटका करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ऍडव्होकेट रंजना अग्निहोत्री यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Story img Loader