नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींच्या सुटकेच्या प्रस्तावावर विचार करताना  केंद्रीय गृह विभागाने या सर्व दोषींच्या चांगल्या वर्तणुकीची दखल घेतली आणि त्यानंतर त्यांच्या सुटकेला मंजुरी देण्यात आली, असे सोमवारी गुजरात सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच त्यावेळी जमावाने ज्या १४ जणांना ठार केले, त्यात बिल्किस यांच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. गोध्रा दंगलीनंतर दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथे हा गुन्हा घडला होता. या प्रकरणातील ११ दोषींना १८ वर्षांच्या तुरुंगवासानंतर १५ ऑगस्ट २०२२ रोजी गोध्रा उपकारागृहातून मुक्त करण्यात आले होते.

गुजरात सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या दोषींचे वर्तन चांगले असल्याचे आढळून आले, पण त्यांच्या सुटकेला पोलीस अधीक्षक, सीबीआय आणि मुंबईतील विशेष न्यायाधीशांनीही विरोध केला होता.