पीटीआय, बालासोर (ओदिशा)
ओदिशात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर बालासोर जिल्हा रुग्णालय आणि सोरो रुग्णालयात मोठय़ा संख्येने जखमींना दाखल करण्यात आले. जखमी रुग्णांनी रुग्णालयाच्या खोल्या आणि आवारही भरून गेले होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक जखमी प्रवाशांना मदत करण्याचा अथक प्रयत्न करत होते.
या कर्मचाऱ्यांपैकी बरेच जण ओदिशा व्यतिरिक्त अन्य राज्यातील आहेत. ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. जखमींवर बालासोर-सोरोसह भद्रक, जाजपूर हॉस्पिटल आणि कटकमधील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयांत उपचार होत आहेत.शनिवारी दुपापर्यंत सुमारे ५२६ जखमींना बालासोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी (एडीएमओ) डॉ. मृत्युंजय मिश्रा म्हणाले, मी अनेक दशकांपासून या व्यवसायात आहे, परंतु माझ्या संपूर्ण कारकिर्दीत असे चित्र कधीच पाहिले नाही. अचानक २५१ जखमींना उपचारासाठी आणण्यात आले. आमचे रुग्णालय व आम्ही त्यासाठी अजिबात तयार नव्हतो. आमच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून सर्वाना प्राथमिक उपचार दिले. यापैकी ६४ रुग्णांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. आमच्या रुग्णालयात ६० खाटा आहेत. इतरांना किरकोळ शस्त्रक्रियेनंतर सोडून देण्यात आले.
रुग्णालयाचे शवगृह पांढऱ्या आच्छादनात गुंडाळलेल्या मृतदेहांनी भरलेले आहे, त्यापैकी अनेकांची ओळख अद्याप पटलेली नाही. येथील प्रमुख रेल्वे मार्गावर हा अपघात झाल्याने येथील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांपैकी अनेकांचे नातलग अद्याप येथे पोहोचू शकले नसल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक गाडय़ा रद्द केल्या आहेत, अनेक रेल्वेगाडय़ांचे मार्ग बदलले आहेत. अनेक गाडय़ा उशिराने धावत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले, की या मदतकार्यात सहाय्य करण्यासाठी भुवनेश्वरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक बालासोर, कटकला रवाना केले आहे.
नागरिकांचे उत्स्फूर्त रक्तदान
डॉ. मृत्युंजय मिश्रा यांनी सांगितले, की येथे मोठय़ा संख्येने तरुण रक्तदान करण्यासाठी आले हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही रात्रभर ५०० बाटल्या रक्त गोळा केले. त्या सर्वाचे आभार. अशी स्थिती आयुष्यात फार कमी वेळा अनुभवावयास मिळते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी स्वेच्छेने येथे आणि इतर अनेक रुग्णालयांत रक्तदान करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जखमींना मदतीसाठी दोन हजारांहून अधिक लोक रात्री बालासोर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले.