रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रूपात समांतर राज्यव्यवस्थाच निर्माण झाली असून ते आपल्या पाशवी बळाद्वारे देशभरातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आर्थिक व्यवस्थेस ओरबाडत आहेत, या शब्दात पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी मंगळवारी शरसंधान केले. उद्योगक्षेत्राने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेत गांधी बोलत होते.
समांतर आर्थिक व्यवस्थेच्या रूपात काळा पैसा अर्थव्यवस्थेत आहे, असे आपण नेहमीच बोलत असतो. परंतु रिलायन्स समूह हा तर समांतर राज्यव्यवस्थाच चालवीत असून ते देशातील साधनसंपत्तीवर कब्जाच करीत आहेत, अशी टीका गांधी यांनी केली. एखाद्याच उद्योगसमूहाने देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक व्यवस्था, व्यावसायिक सामग्री अशा प्रकारे ओरबाडण्याचे उदाहरण कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही, असाही टोला गांधी यांनी मारला. त्यांच्या या कृत्यामुळे अंबानींकडून मनुष्यबळावर कब्जा केला जात आहे, असे ते म्हणाले.
गांधी यांनी देशाच्या आर्थिक आरोग्याचा आढावा घेतला. आपल्या अर्थव्यवस्थेने अनेक यशस्वी गोष्टी केल्या आहेत. अनेक बेघरांना घरे प्राप्त झाली. अनेकांना आवश्यक त्या वस्तूंचा लाभ झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, आपल्या अर्थव्यवस्थेची दुसरी बाजूही बघितली पाहिजे, असे सांगत ही अर्थव्यवस्था काहीशी आजारी, रोगग्रस्त झाल्याचे गांधी म्हणाले. उद्योगक्षेत्राच्या हावरेपणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. पैशांचा लोकशाहीवरही परिणाम होत असल्याचा इशारा गांधी यांनी दिला.
केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) सरकारी कुऱ्हाड ठरला असून तो कटकारस्थानांचा विभाग बनला आहे. त्यावर अपारदर्शीपणाच्या गूढतेचे वलय लागले आहे आणि म्हणून हे खाते अपकीर्तीचे धनी ठरले आहे, या शब्दांत गांधी यांनी सीबीआयबद्दलची आपली मते मांडली. विशेष म्हणजे सदर व्याख्यानमालेत सीबीआयचेच विशेष वक्ते म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले होते आणि त्यांच्या समोरच गांधी यांनी उपरोक्त मते मांडली. या वेळी सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीबीआयला माहितीच्या अधिकाराखाली आणण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केली.
रिलायन्स इंडस्ट्रीज हे समांतर राज्यच -गोपाळकृष्ण गांधी
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रूपात समांतर राज्यव्यवस्थाच निर्माण झाली असून ते आपल्या पाशवी बळाद्वारे देशभरातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आर्थिक व्यवस्थेस ओरबाडत आहेत,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-04-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance industries a parallel state gopalkrishna gandhi