रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) कडून जर्मन रिटेलर मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी याबाबतचा करणार करण्यात आला असून हा करार २८५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून जारी प्रसिद्धीपत्रकारद्वारे देण्यात आली आहे. ‘मेट्रो इंडिया’ कंपनी खरेदी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेल’ची आता डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.
मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने २००३ मध्ये भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली होती. कॅश-अँड-कॅरी उद्योग प्रकारात व्यवसाय सुरू करणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. सद्यस्थितीत कंपनीचे भारतातील २१ शहरांमध्ये ३१ मोठे स्टोअर्स आहेत. तसेच या कंपनीत तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.
हेही वाचा – काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीच्या ‘चिल्लई कलान’ हंगामास सुरुवात
दरम्यान, आज झालेल्या करारानुसार मेट्रो कंपनीचे भारतातील ३१ स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टी ब्रॅण्ड रिटेल चेन तयार करण्यात येणार आहे. मेट्रोची भारतातील ३१ घाऊक वितरण केंद्रे तसेच लँड बँक आणि इतर किरकोळ दुकाने रिलायन्सच्या मालकीची होतील. मेट्रोचा वार्षिक महसूल एक अब्ज डॉलरच्या घरात आहे.