रिलायन्स जिओ ही सेवा अल्पावधीतच भारतात लोकप्रिय झाली. सुरुवातीला मोफत डेटा आणि मोफत व्हॉइस कॉल दिल्यानंतर आता जिओने दर आकारण्यास सुरुवात केली आहे. जिओच्या ग्राहकांनी डेटा वापरामध्ये अनेक उच्चांक मोडले आहेत. जिओचे ग्राहक महिन्याला ११० कोटी जीबी डेटा वापरतात अशी माहिती रिलायन्सने दिली आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १०.८ कोटींच्या वर गेली असल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटी झाली होती. फेब्रुवारीनंतर जिओला केवळ ८ लाखच ग्राहक जोडता आले आहेत. जिओने गेल्या काही दिवसांपासून पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील जिओला आपले कोट्यवधी ग्राहक टिकवून ठेवण्यास यश मिळाले आहे.
केवळ ८५ दिवसांमध्येच ५ कोटी ग्राहकांनी जिओसाठी नोंदणी केली होती. तर १७० दिवसांमध्ये जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटी झाली होती. जिओचे ग्राहक महिन्याला ११० कोटी जीबी डेटा वापरत असल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे. तसेच दिवसाला २२० कोटी मिनिटांचे व्हाइस कॉल आणि २२० कोटी व्हिडिओ कॉल जिओवरुन केले जात असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. अमेरिकेमध्ये मोबाइल नेटवर्कवर जितका डेटा वापरला जातो तितका डेटा रिलायन्स जिओचे ग्राहक वापरतात असे रिलायन्सने म्हटले आहे. तर चीनमध्ये जितका डेटा वापरला जातो त्याच्या निम्मा डेटा जिओचे ग्राहक वापरतात असे त्यांनी म्हटले आहे.
इतर कुठल्याही देशापेक्षा भारत सर्वाधिक वेगाने डिजीटायजेशनकडे जात आहे असे रिलायन्सने म्हटले आहे. आतापर्यंत २६ लाख लाइफ स्मार्टफोन्स आणि जिओफाय पॉकेट राउटर विकण्यात आले आहेत. जिओशी संबंधित एकूण १ कोटी हार्डवेअर उत्पादने विकली गेली आहेत असे रिलायन्सने सांगितले. रिलायन्स जिओ फायबर टू द होम (एफटीटीएच) ही ब्रॉडबॅंड सर्व्हिस मार्च अखेरनंतर लाँच केली जाणार आहे. सध्या या सेवेची चाचणी सुरू आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर १५०० रुपयांमध्ये एक महिन्याच्या वैधतेमध्ये ५० एमबीपीएस या गतीने २००० जीबी डेटा वापरता येणार आहे.