मोबाइल क्षेत्रात खळबळ उडवून देणारी रिलायन्स जिओ कंपनी आता पेमेंट बँकिंग क्षेत्रातही उतरली आहे. जिओने आजपासून (दि.०३) बँकिंगचे काम सुरू केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली. ऑगस्ट २०१५ मध्ये पेमेंट बँक सुरू करण्यासाठी ११ जणांना परवानगी देण्यात आली होती. रिलायन्स उद्योगसमूह त्यापैकी एक आहे. जिओच्या आगमनाने आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, जिओ पेमेंट बँकेने ३ एप्रिल २०१८ पासून पेमेंट बँकेच्या स्वरूपात व्यवहारास सुरूवात केली आहे. मोबाइल क्षेत्रातील भारती एअरटेलने नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वांत पहिल्यांदा पेमेंट बँक सुरू केली होती. पेटीएमचे संस्थापक विजय शेख शर्मा संचलित पेटीएम बँकेने मे २०१७ आणि फिनो पेमेंट बँकेने मागील वर्षी जूनमध्ये व्यवयासास सुरूवात केली होती.
जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रवेश केला होता. मोफत कॉल आणि डेटा यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कंपनी बँकिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. जिओचा आतापर्यंतचा प्रवास पाहता पेमेंट बँकिंगमध्ये आता तगडी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.