प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरु झालेले दर युद्ध आणखी वर्षभर किंवा जिओचे युझर्स दुप्पट होईपर्यंत चालण्याची शक्यता आहे. किंमती वाढवण्याआधी जिओ युझर्सची संख्या दुप्पट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असे हाँगकाँग स्थित ब्लूमबर्ग इंटलिजन्सचे कुणाल अग्रवाल यांनी सांगितले.

भारतातील मोबाईल कंपन्यांमध्ये हे दर युद्ध आणखी एक-दोन वर्ष असेच चालेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. रिलायन्स जिओने मोफत कॉल सेवा आणि वापरकर्त्याच्या सोयीचा डेटा पॅक देऊन टेलिकॉम क्षेत्रात दणक्यात प्रवेश केला. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना आपले दर कमी करावे लागले तसेच उत्पन्नाचा स्त्रोत सावरण्यासाठी काही कंपन्यांना विलीनकरण करावे लागले.

२०१६ मध्ये रिलायन्स जिओची सेवा सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिओचे २१.५ कोटी वापरकर्ते आहेत. जिओने ४ जी सेवा स्वस्तात उपलब्ध करुन अन्य कंपन्यांना दर खाली आणायला भाग पाडले. आता जास्तीत जास्त मार्केट शेअर मिळवून टेलिकॉम बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा जिओचा प्रयत्न असेल असे कुणाल अग्रवाल यांनी सांगितले. सध्या भारताच्या मोबाइल बाजारपेठेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल लिमिटेड, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.