उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा निर्णय न्यायालयाकडून रद्दबातल;
निकालाविरोधात मोदी सरकार आज सर्वोच्च न्यायालयात
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निकाल देत उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पुनस्र्थापना केली. या सरकारला २९ एप्रिलला बहुमत सिद्ध करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. या निकालामुळे ‘काँग्रेसमुक्त’ उत्तराखंडसाठी केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मनमानीला जबरदस्त चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारीच या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने आपली प्रतिमा जपण्याची धडपड सुरू केली आहे.
कलम ३५६चा वापर करीत उत्तराखंडमधील काँग्रेसचे सरकार २७ मार्चला बरखास्त करण्यात आले होते. त्याविरोधात मुख्यमंत्री हरीश रावत यांनी याचिका दाखल केली होती. गेल्या तीन दिवसांच्या सुनावणीत मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारच्या घिसाडघाईचा समाचार घेतला होता. राष्ट्रपती राजवटीसाठी सर्वोच्च न्यायालयाने जे निकष निश्चित केले आहेत, त्यांची केंद्राकडून सर्रास पायमल्ली झाल्याचे खंडपीठाने गुरुवारी निर्णय देताना नमूद केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातली केंद्राची धाव यशस्वी होते का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
उत्तराखंड न्यायालयात हार झाली असली तरी विधिमंडळात आमची जीतच होईल, अशी भावना भाजप नेत्यांनी व्यक्त केली. पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गिय म्हणाले की, गेले तीन दिवस न्यायालय जी वक्तव्ये करीत होते त्या पाश्र्वभूमीवर हा निकाल अपेक्षितच होता. रावत यांचे सरकार अल्पमतातच होते आणि उद्याही ते अल्पमतातच राहील. २९ एप्रिललाही ते सिद्ध होईल.
१८ मार्च रोजी उत्तराखंड विधानसभेत मांडण्यात आलेल्या विनियोजन विधेयकावर मतविभाजनाची भाजपची व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मागणी अध्यक्षांनी अमान्य केली होती. पर्यायाने हे अर्थविधेयक पराभूत झाल्याने सरकारने बहुमत गमावल्याचा दावा या आमदारांनी केला होता. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने २८ मार्चला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याच्या एक दिवस आधीच, राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याचे कारण देऊन केंद्र सरकारने येथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
आता काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णयही खंडपीठाने योग्य ठरवला. या आमदारांना त्यांच्या ‘घटनात्मक पापाची’ किंमत मोजावी लागेल, असे न्यायालयाने नमूद केले.
काँग्रेसनेही उत्तराखंड प्रकरणावरून मोदी सरकारविरुद्ध राज्यसभेत िनदाव्यंजक ठरावाची सूचना दिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाची सुरुवातच वादळी होण्याचीही चिन्हे आहेत.
केंद्राच्या मनमानीला चपराक
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा निर्णय न्यायालयाकडून रद्दबातल
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-04-2016 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for harish rawat ias uttarakhand hc axes presidents rule