Relief for Sadhguru: ‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर आश्रमात दोन बहि‍णींना बळजबरीने डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना आश्रमाची झडती घेण्याचे आदेश दिले होते. या कारवाईनंतर ‘ईशा फाऊंडेशन’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याविरोधात याचिका दाखल केली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने कामराज यांची हेबियस कॉर्पस याचिका फेटाळून लावत सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मोठा दिलासा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवृत्त प्राध्यापक डॉ. एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात कोईम्बतूरमधील ईशा फाऊंडेशनच्या आश्रमाविरोधात तक्रार दाखल केली होती. गीता (४२) आणि लता (३९) या दोन मुलींन आश्रमात बळजबरीने डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. सदर याचिका फेटाळत असताना भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. दोन महिला स्वच्छेने त्या आश्रमात राहत आहेत, हे त्यांनी सांगितल्यानंतरही उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावण्याऐवजी आपले कार्यक्षेत्र ओलांडून निर्णय घेतला.

हे वाचा >> Isha Foundation Case: ‘अशा संस्थांमध्ये पोलिस किंवा सैन्य घुसवणं बरं नाही’; ईशा फाउंडेशनवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ईशा फाऊंडेशनने पोलिसी कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ज्या दोन महिलांना बंदी बनविल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यांच्याशी खंडपीठाने सरन्यायाधीशांच्या दालनात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेली दोन्ही महिलांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना सांगितले की, त्या दोघीही स्वच्छेने आश्रमात राहत आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काय झालं?

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर १ ऑक्टोबर रोजी अतिरीक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांनी जग्गी वासूदेव यांच्या कोईम्बतूर येथील आश्रमात धडक दिली होती. एस. कामराज यांनी उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल करून ईशा फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्या दोन मुली गीता कामराज ऊर्फ माँ माथी (४२) आणि लता कामराज ऊर्फ माँ मायू (३९) यांना आश्रमात कोंडून ठेवण्यात आले असून त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसेच दोन्ही मुलींशी कुटुंबाचा संपर्क होऊ दिला जात नसल्याचेही ते म्हणाले होते.

तत्पूर्वी ३० सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासूदेव यांच्या वकिलांना प्रश्न विचारला की “जग्गी वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न लावून दिलेले असताना ते इतर तरुणींना संसाराचा त्याग करून, केशवपन करून संन्याशांसारखे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?” न्यायमूर्ती एस. एम. सुब्रह्मण्यम आणि न्या. व्ही. शिवाग्ननम यांनी जग्गी वासूदेव यांच्या कारभारावर टीका केली. जग्गी वासूदेव यांच्याविरोधातील याचिकेत म्हटले आहे की, ईशा योग केंद्रात राहण्यासाठी सद्गगुरूंकडून तरुणींचे ब्रेनवॉश केले जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for sadhguru as supreme court dismisses plea against isha foundation kvg