उत्तराखंडमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी आकाश निरभ्र राहिल्याने या पूरग्रस्त राज्यातील पुनर्वसनाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा साठा मंगळवारी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ातील बाधित गावांमध्ये पाठविण्यात आला.
तथापि, काही वेळ ढगाळ वातावरण असल्याने मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा देवल, थराली आणि नारायमबागड येथील नियोजित दौरा रद्द करावा लागला. चामोली जिल्ह्य़ातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने दळणवळणात काही प्रमाणात अडचणी येत आहेत.
मात्र मंगळवारी आकाश निरभ्र असल्याने हवाई मार्गाने मदत पाठविण्याचे त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी संजयकुमार यांनी सांगितले. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जवळपास ८४ गावांमध्ये अन्नधान्याचा पुरेसा उपलब्ध करून देण्यात आला असून घोडे आणि अन्य प्राण्यांच्या मदतीने रस्त्यावरूनही आणखी ५० गावांमध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.
तथापि, पावसाच्या तुरळक सरींमुळे चंपावत जिल्ह्य़ातील पूर्णागिरी येथे रस्त्यावर चिखल साचला आहे. या ठिकाणचा रस्ता तीन आठवडय़ांपासून बंदच आहे. उत्तरकाशी जिल्ह्य़ातील गंगोत्री पूल दुरुस्त करण्यात आला असून काही आठवडय़ांनंतर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
केदारनाथ येथे दगड फोडण्याची मोठी यंत्रे शक्य तितक्या लवकर रवाना करून तेथील दगडमातीचा ढिगारा हलविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचे बहुगुणा यांनी सांगितले. दगडमातीचा मोठा ढिगारा अद्यापही केदारनाथ मंदिराजवळ असून त्या खाली काही यात्रेकरू गाडले गेले असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.