Land For Jobs Scam : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद, त्यांची मुले तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सोमवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला. यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबीयांनी कथितरित्या जमिनी मिळवल्याचा आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व आरोपींना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा देण्यात आला आहे. आरोपपत्रात त्यांचा उल्लेख असला तरीही त्यांना अटक करण्यात आली नव्हती. आता या प्रकरणावर २३ आणि २४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरजेडी प्रमुख लालू यादव यांनी पत्रकारांना सांगितले, “आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.” यादव यांचा मुलगा तेजस्वी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि न्यायालयाने आज आम्हाला जामीन मंजूर केला आहे. ते अनेकदा राजकीय षड्यंत्र रचतात आणि एजन्सीचा गैरवापर करतात. आमचा विजय निश्चित झाला आहे.”

नोकऱ्यांसाठी जमिनी घोटाळा प्रकरणात सीबीआयने जून महिन्यात माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य ७७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.या यादीत एकूण २९ रेल्वे अधिकारी, ३९ उमेदवार आणि सहा अन्य व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांविरोधात फसवणूक आणि खोट्या सह्या करण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेसाठी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रेही सादर केली होती.

लँड फॉर जॉब प्रकरण काय आहे?

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ या काळात हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी १८ मे रोजी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुली मिसा आणि हेमा यादव यांच्यासह २००८-२००९ मध्ये मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर, हाजीपूरमध्ये रेल्वेत नोकरी मिळालेल्या १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रेल्वेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने २३ सप्टेंबर २०२१ रोजी प्राथमिक तपास केला होता. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी अर्ज केल्याच्या तीन दिवसांच्या आत ड श्रेणीतील पदांवर पर्यायी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या बदल्यात उमेदवारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन हस्तांतरित केली.

हेही वाचा >> विश्लेषण: ‘Land For Jobs’ प्रकरण काय आहे? लालू आणि तेजस्वी यादव अडचणीत येणार का?

विक्री कराराच्या माध्यमातून राबडी देवी यांच्या नावे तीन आणि मिसा भारती यांच्या नावे एका जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलं. तर हेमा यादव यांच्या नावे भेटवस्तू म्हणून जमिनीचं हस्तांतरण झालं असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, पाटणामधील जवळपास १.५ लाख स्क्वेअर फूट जमीन लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाने विक्रेत्यांना रोख रक्कम देत संपादित केली. “लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांकडे असणाऱ्या सात जमिनींचं बाजारमूल्य सध्या ४ कोटी ३९ लाख आहे. तपासादरम्यान, यादव कुटुंबीयांनी विक्रेत्यांकडून खरेदी केलेली जमीन ही बाजारमूल्यापेक्षा कमी दराने विकत घेण्यात आली असल्याचं निष्पन्न झालं आहे,” अशी नोंद एफआयआरमध्ये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief to lalu prasad yadav and his children bail granted in land for jobs scam case sgk