Dattatray Hosable : कर्नाटक सरकारच्या सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी विरोध केला आहे. आपलं संविधान धर्मआधारित आरक्षणाला परवानगी देत नाही, असं ते म्हणाले. तसंच, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या हे विरुद्ध आहे, असंही ते म्हणाले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्य समारोपावेळी ते बोलत होते.

दत्तात्रय होसबळे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारले जात नाही. असे करणारे कोणीही आपल्या संविधानाच्या शिल्पकाराच्या इच्छेविरुद्ध जात आहे.” त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की मुस्लिमांसाठी धर्मावर आधारित आरक्षण लागू करण्याचे पूर्वीचे अविभाजित आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राने केलेले प्रयत्न उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. तसंच, न्यायालयांनी अशा आरक्षणासाठी तरतुदी नाकारल्या असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

गंगा यमुनेचा आदर करणाऱ्यांनीही औरंगजेबाला आयकॉन बनवलं

महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “समाजात कुठलाही विषय समोर येऊ शकतो. औरंगजेब मार्गाचं नाव बदलून ते अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलंच. जे लोक गंगा आणि यमुना यांचा आदर करतात अशा लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवलं. असे लोक औरंगजेबाच्या भावाविषयी काहीही बोलत नाहीत. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरावयचं की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा हा खरा प्रश्न आहे. असं दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलं आहे.

आक्रमक मानसिकतेचे लोक भारतासाठी संकट आहेत. अशाच प्रवृत्तीचे लोक औरंगजेबाचं महत्त्व वाढवत आहेत. अशी थेट भूमिका होसबळे यांनी मांडली त्याचप्रमाणे त्यांनी वक्फबाबतची त्यांची मतं मांडली आहेत. वक्फबाबत ज्या चर्चा सुरु आहेत त्या समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच अयोध्येत झालेलं राम मंदिर हे फक्त संघ नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले आहेत.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्या विरोधात आम्ही संघाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अन्याय, त्यांच्या विरोधात कट करुन केली जाणारी हिंसा, त्यांच्यावरचे अन्याय तसंच शोषण याबाबत आम्ही निषेध नोंदवला आहे हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि एकजूट करुन राहिलं पाहिजे असंही होसबळेंनी म्हटलं आहे.