शीख, हिंदू आणि अरब वंशाच्या अमेरिकन समाजाविरोधात होणाऱ्या गुन्ह्य़ांमागील हेतूचा समूळ छडा लावून हे गुन्हे धर्मद्वेषातून झाले आहेत काय, याचा शोध घेण्याची शिफारस अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या (एफबीआयच्या) धोरण सल्लागार मंडळाने बुधवारी केली असून तिचे अमेरिकेतील हिंदू व शीख संघटनांनी स्वागत केले आहे. हे योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे.
अमेरिकन प्रतिनिधीगृहात डॉ. अ‍ॅमी बेरा हे भारतीय वंशाचे एकमेव प्रतिनिधी आहेत. धर्मद्वेषविरोधी कायद्यांसाठी त्यांनी आजवर बरेच प्रयत्न केले आहेत. ते म्हणाले की, हिंदू व शीखांविरोधातील गुन्ह्य़ांचा असा सखोल छडा लावणे हे योग्य दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशननेही या शिफारशीचा तात्काळ स्वीकार व्हावा, अशी मागणी केली आहे.
९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शीख, हिंदू आणि अरब वंशाच्या अमेरिकन नागरिकांविरोधातील गुन्ह्य़ात वाढ झाली होती. आपल्याला दुय्यम नागरिकासारखी वागणूक मिळत असल्याचीही त्यांची तक्रार होती. त्यासाठी या गुन्ह्य़ांचा सखोल माग घेण्याची या धार्मिक गटांच्या संघटनांची पूर्वापार मागणी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा