हिंदू धर्मात चिता पेटवल्याने निघणारा धूर, मुस्लिम व बौद्ध धार्मिक स्थळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमुळे निघणारे धुराचे लोट यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत असून परिणामी भारतीय उपखंडात तापमानवाढ होत आहे. या पद्धतीने जी तापमानवाढ होत आहे त्यामुळे हिमालयातील हिमनद्या वितळण्याची भीती आहे असे एका नवीन अभ्यास अहवालात म्हटले आहे.
संशोधकांना अनेक दिवसांपासून असे वाटत होते किंवा शंका होती की, भारत, नेपाळ व दक्षिण आशियात धार्मिकतेच्या नावाखाली जी कृत्ये केली जातात त्यामुळे तपकिरी कार्बनची काजळी या प्रदेशातील वातावरणात पसरते .
अमेरिकेतील नेवाडाच्या डेझर्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे संशोधक व पश्चिम भारतातील छत्तीसगडमधील पंडित रवीशंकर शुक्ला विद्यापीठाचे संशोधक यांनी संयुक्तपणे जो अभ्यास केला त्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की, भारतात जीवाश्म इंधनांचा वापर केला जातो त्यामुळे प्रदूषणात २३ टक्के वाढ होते व वातावरणात पसरणारे सर्व कण हे कर्करोगकारक कार्बनी संयुगांचे आहेत असे द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तात म्हटले.
२०११ ते २०१२ या काळात हे संशोधन करण्यात आले असून विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, मंदिरातील उदबत्त्या, दफनस्थाने, गाईचे शेण, कापूर, पाने, गोमूत्र हे पदार्थ जाळल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. फॉरमॅल्डीहाईड, बेन्झिन, स्टायरिन, ब्यूटाडाइन यासारखे चौदा कार्बनी विषारी घटक सोडले जातात असे नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.
हिंदू धर्मात चिता रचून मृत मानवी शरीरे जाळली जातात तेव्हा तपकिरी रंगाची कार्बनी काजळी एरोसोलच्या कणांच्या रूपात वातावरणात मिसळते, जागतिक तपामानवाढीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. ते काळसर कण हिमावर जमतात व त्यामुळे हिमनद्या वितळतात. या प्रकारे पर्यावरणाची हानी होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार दरवर्षी १ कोटी विवाह होतात व भारतात ३० लाख धार्मिक स्थळे आहेत तिथे नेहमीच्या धार्मिक कार्यक्रमातूनही प्रदूषण होत असते, असे संशोधक शम्स परवेझ यांनी म्हटले आहे.