ब्लू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक हटवण्याचे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, गूगल, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सला दिले आहेत. भारतात ब्लू व्हेल गेममुळे लहान मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या गेमची आणि त्याच्याशी संबंधीत सर्व लिंक तातडीने हटवाव्यात असे पत्रकच केंद्र सरकारने सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सना पाठवले आहे.

गेल्या महिन्यात मुंबईतील एका अल्पवयीन मुलाने ब्लू व्हेल चॅलेंज या गेममुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मनप्रीत सहानी याने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मनप्रीत हा ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. यानंतर इंदौरमध्येही याच गेममुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर सोलापूरचा एक मुलगा या गेममधील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पूण्यात पोहोचला होता. पश्चिम बंगालमध्येही या गेममुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ब्लू व्हेल चॅलेंज या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गेमवर बंदी घालण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. राज्यातील विधानसभेपासून ते दिल्लीत संसदेपर्यंत या गेमवर बंदीची मागणी करण्यात आली होती.

मंगळवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाने गूगल, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, याहू, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व कंपन्यांना एक पत्रक पाठवले. भारतात ब्लू व्हेल गेममुळे लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या गेमववर आणि या गेमशी संबंधीत सर्व लिंक तात्काळ हटवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या सूचनेनंतर हे पत्रक पाठवण्यात आले आहे.

ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला असून या गेममुळे रशियात १३० जणांनी प्राण गमावले. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन मंच वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. या गेमची निर्मिती रशियाचा बावीस वर्षीय तरुण फिलीप बुडेकिन याने केली असून त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती.

Story img Loader