देशातील खरी घाण ही रस्त्यांवर नसून ‘ते आणि आपण’ असा भेदभाव करणाऱ्या आपल्या मनातील विचारांमध्ये आहे. अशा विचारांनी भरलेल्या मनाची शुद्धी केली पाहिजे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मांडले. ते मंगळवारी साबरमती आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींनी महात्मा गांधींचा भारताविषयीचा दृष्टीकोन सर्वसमावेशक राष्ट्राचा असल्याचे सांगत या संकल्पनेत समाजातील प्रत्येकाला समान वागणूक आणि समान संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. याशिवाय, एकमेकांप्रती असलेला विश्वास हाच मानवी जीवनाचा गाभा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
प्रत्येक दिवशी आपण सभोवताली हिंसाचार पाहत आहोत. अंधार, भीती आणि अविश्वास हे घटक या हिंसेच्या मुळाशी आहेत. त्यामुळे एकीकडे आपण या हिंसेला नामोहरम करण्याचे नवनवे मार्ग शोधत असतानाच अहिंसा, चर्चा आणि कारणमीमांसा यांचे महत्त्व लक्षात ठेवले पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात घडलेल्या दादरी आणि अन्य हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अहिंसा ही नकारात्मक शक्ती नसून आपला सार्वजनिक संवाद हा शारीरिक आणि शाब्दिक या दोन्हीप्रकारच्या हिंसेपासून मुक्त असला पाहिजे. केवळ अहिंसावादी समाजातच समाजातील दुर्लक्षित आणि प्रवाहाबाहेरील अशा सर्व घटकांना सहभाग मिळू शकतो, असे राष्ट्रपतींनी म्हटले.