सन २००२मध्ये गोध्रा दंगलीनंतर गुलबर्गा हौसिंग सोसायटीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध नव्याने याचिका करण्यास झकिया जाफरी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनुमती दिली. या हिंसाचारप्रकरणी मोदी यांना विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) मुक्त केले होते. गोध्रा दंगलींनंतर गुलबर्गा हौसिंग सोसायटीत झालेल्या हिंसाचारात काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी अहमदाबादच्या विशेष न्यायालयात न्यायासाठी याचिका दाखल केली होती.
गोध्रा दंगलींनंतर नरेंद्र मोदी आणि अन्य जबाबदार व्यक्तींनी घटनादत्त कर्तव्ये पार पाडली नव्हती, असा आरोप झकिया जाफरी यांनी केला असून विशेष तपासणी पथकाने आपला अंतिम अहवाल सादर करेपर्यंत गुजरातच्या विशेष न्यायालयाने आपला अंतिम निकाल जाहीर करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.