माणसातील भावनिक, मानसिक आणि लैंगिक भावसंघर्षांचा तरल वेध घेणारे बंगाली चित्रपटसृष्टीतील क्रांतीकारी चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते ऋतुपर्णो घोष यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. स्वादुपिंड विकाराने आजारी असलेले घोष  अवघे ४९ वर्षांचे होते.
घोष यांना अवघ्या १९ वर्षांच्या चित्रकारकीर्दीत १२ राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांचे चित्रपट जाणकार रसिकांकडून गौरविले गेले तसेच अनेक चित्रपटांचे शुभारंभाचे खेळ परदेशी चित्रपट महोत्सवातही झाले. त्यांच्या अनपेक्षित मृत्यूने चित्रपट जगत तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रांतून शोकमग्न प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
३१ ऑगस्ट १९६३ रोजी कोलकात्यात ऋतुपर्णो यांचा जन्म झाला. वडील सुनील घोष हेदेखील लघुपटांचे दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. माणसा-माणसांतील भावनिक संघर्ष हा त्यांच्या सर्वच चित्रपटांचा समान धागा असला तरी त्यांचे चित्रपट कधीच भावबंबाळ मात्र झाले नाहीत. सत्यजीत रे यांचा त्यांच्या जडणघडणीवर अमीट प्रभाव होता.
त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच बंगाली चित्रपटसृष्टीतील कलावंतांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पश्चिम बंगालच्या काही मंत्र्यांनी तसेच अन्य राजकीय नेत्यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Story img Loader