बडोदा : प्रख्यात स्तंभलेखक आणि लेखक डॉ. दामोदर नेने यांचे मंगळवारी गुजरातच्या बडोदा येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गेल्या एक वर्षापासून ते आजारपणामुळे अंथरुणाला खिळले होते, अशी माहिती त्यांच्या स्नुषा डॉ. सुचित्रा नेने यांनी दिली. डॉ. नेने यांच्या पश्चात पत्नी वैजयंती, पुत्र मिलिंद आणि मनोज असा परिवार आहे.
१९३१ साली तत्कालीन बडोदा प्रांतात त्यांचा जन्म झाला. १९४९ साली त्यांनी बडोदा वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५३ साली पदवी प्राप्त केल्यानंतर १९५६ सालापासून त्यांनी वैद्याकीय व्यवसायात प्रवेश केला. दररोज दोन वेळा आपल्या दवाखान्यात जाऊन डझनावारी रुग्णांवर उपचार करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. मात्र हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक पैलू झाला. रुग्णसेवेबरोबरच स्तंभलेखन आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी साहित्यसेवाही केली. केसरी, सामना, सोबत, माणूस, धर्मभास्कर, कॅरावान, विकली अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले. आपल्या एका मुस्लीम रुग्णाचे ‘दादूमिया’ हे टोपणनाव घेऊन ते स्तंभलेखन करीत असत. १९६६ साली ‘कॅन इंदिरा अॅक्सेप्ट धिस चॅलेंज’ हे त्यांचे पहिले पुस्तक ‘विजयानंद भारती’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची दखल खुद्द इंदिरा गांधींनी घेतली. कालांतराने डॉ. नेने यांची त्यांच्याशी भेटही घडली. याखेरीज ‘दलितांचे राजकारण’, ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड’, ‘मोदी एक झंझावात’ आणि ‘धास्तावलेले मुसलमान’ ही त्यांची पुस्तकेही गाजली. आणीबाणीच्या काळात तेव्हा रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले नरेंद्र मोदी आपल्या घरी वारंवार भेट देत असत, अशी आठवण डॉ. नेने यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितली होती.