रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबतच अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये, असं देखील म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीदेखील रेणुका शहाणे यांनी त्यांची मते स्पष्टपणे नोंदविली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एका जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांमधून कडाडून टीका झाली. त्यासोबतच जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. या घटनेनंतर रेणुका शहाणे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

“महिलांचा आदर न राखता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान सारख्या व्यक्तींना कदापि निवडणुकीचं तिकीट देता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. प्रत्यक्षात कारवाईदेखील करणं गरजेचं आहे. ही कारवाई नक्की होईल का ? मुळात त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये”, असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं आहे.

दरम्यान, जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका सुरु झाल्यानंतर आझम खान यांनी आपण जया प्रदा यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्त्य केलेले नाही, असा दावा केला आहे. मात्र आझम खान यांच्याविरोधात सोमवारी महिलेवर हीन पातळीवर टीका केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renuka shahane says azam khan should not be allowed to fight this election