रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले तिमाही पतधोरण जाहीर केले. ज्यामध्ये Repo Rate रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपो रेट ६ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के असाच कायम ठेवण्यात आला आहे. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहकर्ज धारकांना दिलासा मिळालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती भडकल्या आहेत. तसेच खाद्य उत्पादनेही महाग झाली आहेत त्यामुळेच यावेळी जाहीर होणाऱ्या पतधोरणात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज काही मार्केट तज्ज्ञांनी वर्तवला होता. तो खरा ठरला आहे. चौथ्या तिमाहीत महागाई दर ५.१ टक्के राहू शकतो असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे. व्याज दर कपातीसाठी आरबीआय समोर अनेक आव्हाने होती. मात्र तूर्तास तरीही कोणतेही बदल न करता आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत.
Repo rate remains unchanged at 6%, and reverse repo rate remains unchanged at 5.75%: RBI pic.twitter.com/CdHhVRauPa
— ANI (@ANI) February 7, 2018
‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार ६० पैकी ५८ अर्थतज्ज्ञांनी रिव्हर्स रेपो आणि रेपो रेट जैसे थेच राहतील असा अंदाज वर्तवला होता. तसेच व्याजदरांमध्येही कोणतीही कपात होणार नाही असेही या तज्ज्ञांनी म्हटले होते. याआधी ऑक्टोबर महिन्यातही तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आले होते. त्यावेळीही रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात झाली होती. त्यानंतर कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.