पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला. ‘द हिंदू’ने जर्मनी दौऱ्यावर असणाऱ्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबला असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर भगवंत मान यांच्याबाबत इतर दावे होत असून आम आदमी पक्षानेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
पंजाब सरकारला सहा महिने पूर्ण; भ्रष्टाचारापासून ते ऑडिओ क्लीपर्यंत ‘ही’ सहा प्रकरणं राहिली वादग्रस्त
विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं असून याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तब्येत ठीक नसल्याने भगवंत मान यांना परत येण्यास उशीर झाला असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. भगवंत मान यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र आम आदमी पक्षाने हा कट असल्याचा आरोप केला आहे.
अकाली दलाकडून टीका
दाव्यानुसार, भगवंत मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. “जास्त नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याचे काही रिपोर्ट्स येत आहेत. त्यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही ते गैरहजर राहिले. या घटनेने जगभरातील पंजाबींना लाज वाटत आहे,” असं ट्विट अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले आहेत की “पंजाब सरकार मात्र या मुद्द्यावर शांत बसलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पंजाबी आणि देशाच्या अभिमानाचा मुद्दा असल्याने केंद्र सरकारने याची दखल घेतली पाहिजे. जर त्यांना विमानातून उतरवलं असेल, तर सरकारने जर्मनच्या प्रतिनिधींकडे हा मुद्दा उपस्थित करायला हवा”.
काँग्रेसनेही यासंबंधीची बातमी शेअर केली आहे. यामध्ये भगवंत मान आपल्या दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. त्यांच्या पत्नी आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना आधार दिला होता अशी माहिती सहप्रवाशाने indianarrative.com शी बोलताना दिल्याचा उल्लेख आहे.
आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग यांनी सांगितलं आहे की “ठरल्याप्रमाणे १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री परत आले. सोशल मीडियावरील सर्व रिपोर्ट प्रोपागंडा आहे. विदेशातून गुंतवणूक आणत असल्याने विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. तुम्ही विमान कंपनीकडेही तपशील मागू शकता”.