२६ जानेवारीला कर्तव्यपथावरुन संरक्षण दल, निमलष्करी दल, तसंच केंद्र सरकारच्या विविध तुकड्या संचलन करतात. तसंच या संचलनात केंद्र सरकारच्या विविध संस्था आणि विविध राज्य सरकारचे चित्ररथ हे एक मोठे आकर्षण असते. तसंच या संचलनाच्या शेवटी संरक्षण दलातील लढाऊ विमाने, मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर हे कर्तव्यपथावरुन उड्डाण करत सलामी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
यावेळी झालेल्या संचलनात नौदलाच्या एका टेहळणी विमानाने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. यावेळी त्या टेहळणी विमानाने कर्तव्यपथावरुन केलेले पहिले आणि शेवटचे उड्डाण ठरले. या टेहळणी विमानाचे नाव आहे IL-38, हे नौदलाच्या सेवेतून गेल्या वर्षी, १७ जानेवारी २०२२ ला निवृत्त झाले होते. यानिमित्ताने एका vintage aircraft ने कर्तव्यपथावरुन उड्डाण केलं असंच म्हणावे लागेल.
IL-38 नौदलाचा हवाई डोळा
रशियन बनावटीचे IL-38 हे टेहळणी विमान हे १९७७ ला नौदलाच्या सेवेत दाखल झाले होते. अशी एकूण पाच विमाने दाखल झाली होती, २००२ ला झालेल्या एका अपघातात दोन विमाने नौदलाने गमावली होती. असं असलं तरी भारताच्या तिन्ही बाजूला पसरलेल्या अथांग समुद्रावर नजर ठेवण्याचे काम हे या IL-38 टेहळणी विमानाच्या माध्यमातून केले जात होते.
अद्भुत क्षमतेचे IL-38
एका दमात १३ हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची किंवा सलग १३ तास उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता होती. विमानात आणि विमानाच्या वर असलेल्या विविध संवदेकांमुळे दुरच्या अंतरावरुनच पाण्यावरील युद्धनौका, जहाजे तर पाण्याखाली असलेल्या पाणबुड्यांचा शोध लावण्याचे काम हे विमान लिलया करत असे. या टेहळणी विमानामुळे नौदलाच्या संचार क्षमतेत मोठी भर पडली होती.
आता या विमानांची जागा अत्याधुनिक P-8i या विमानांनी घेतली आहे.