भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपावेतो ७५ वर्षात राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी जनपथवरील संचलन सकाळी १० वाजता सुरू होत आलंय. मात्र, यंदा पहिल्यांदाच हे संचलन अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. यामागे करोना निर्बंध आणि जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहिले जाणार आहे ही कारणं सांगितली जात आहे.
एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, “दरवर्षी प्रजासत्ताक संचलन सकाळी १० वाजता सुरू होतं. मात्र, यावर्षी हे संचलन साडेदहा वाजता सुरू होईल. करोन निर्बंध आणि संचलनाआधी जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे यामुळे हा उशीर होईल. मागील वर्षाप्रमाणेच हे प्रजासत्ताक संचलन ९० मिनिटांचं असणार आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरियलला भेट देतील. याशिवाय सांस्कृतिक वैविध्य, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे रथ देखील संचलित होतील. हे रथ लाल किल्ल्यापर्यंत जातील आणि नागरिकांना पाहता यावेत यासाठी तेथेच प्रदर्शनासाठी लावले जातील” असंही या अधिकाऱ्याने नमूद केलं.
करोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या कलाकारांना कुणालाही भेटण्याची परवानगी असणार नाहीये. त्यांना वेगळ्या वाहनांमध्ये प्रवासाची व्यवस्था करून संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.